Monday, July 19, 2010

पोपट आणि कोकिळा

एकदा एक पोपट पडला कोकिळेच्या प्रेमात
मागे मागे तिच्या सतत फिरू लागला रानात
चोचीत नेहमीच तिचे नाव,गुंजारव जोरात
कोकिळा जरी टाळे त्याला,हा तिच्या घरात.

वेडा राघू वेडा राघू सारं जंगल त्याला चिडवे
दशा बघून कोकिळेचे मन झाले हळवे

डोक्यावरनं पाणी गेले,पोपट झाला दिवाणा
सतत सतत तिला भेटण्याचा करू लागला बहाणा

घाबरून त्याला कोकिळा, जात असे पळून
समजावण्याचा तरी प्रयत्न करी अगदी लपून

साम दाम दंड ,सारे मार्ग जरी संपले
युद्ध प्रेमाचे पोपटासाठी आजून होते जुंपले

अखेर थकून कोकिळा आली त्याच्या दारात
सुरू केला अखेरचा यत्न केविलवाण्या सुरात

अरे बाबा होऊ शकत नाही तुझी
पक्षी जरी असलो तरी आपली ब्रीड आहे निराळी
तू आहेस पोपट, सतत करतो विठू विठू
अन मी कोकिळा, करते कुहुहू
रंगाने तू हिरवा आणि मी काळी
जमेल कशी सांग आपली ही जोडगोळी
राघू मैना जोडी साऱ्या नुसत्या कल्पना
सोड तू साऱ्या प्रेमाच्या वल्गना
सोडून दे वेडेपणा हो जरा शाहणा
जीव घेईन माझा मीच,नाही हा बहाणा

अखेर मनावर दगड ठेवून,पोपट झाला तयार
प्रेमाच्या युद्धात घेतली त्याने माघार
ह्रिदय आपलं घट्ट करून पोपट अखेर वदला
येणार नाही मार्गात तुझ्या,जरी प्राण माझा गेला

आसवं होती थोडी दोघांच्याही डोळ्यात.

उडून गेली कोकिळा जेव्हा
सारी सृष्टी हळहळली
भकास झाली जिंदगी
पोपटाने मान टाकली
जखम झाली मनाला, हा घाव कसा भरू ?
बराच काळ गेला,आता त्यावर खपली लागली धरू

पुढे भेटला कोकिळेला तिचा मनाजोगा प्रियकर
निघून गेला सुख काळ किती तरी भुर्कन.

अश्याच एका बेसावध क्षणी काळ आला धावून
लपला होता पारधी तिथे अगदी घात लावून
टाकल जाळ त्याने त्यांच्या वर अगदी नेम धरून
झाली खूप ओढाताण,कोकीळ गेला मारून
भान हरपला कोकिळेच आकानतांडव करून

आली शुद्ध जेव्हा तिला,होती एका पिंजऱ्यात
इकडे तिकडे पाहता आल काही तिच्या ध्यानात
सोबत पिंजऱ्यात होता पोपट , बसला एका कोपऱ्यात
आणि तीच आसवं पुन्हा होती दोघाच्याही डोळ्यात.

No comments:

Post a Comment