Monday, December 8, 2014

पंखा ९

दोन पंखे आमने सामने ,
विरुद्ध दिशांत जोरात फिरत होते. 
गर्मी काही जात नव्हती ,
बिल मात्र वाढत होते.

Thursday, July 3, 2014

पंखा ८

पंखा एकदा पंखा बनून रहायला कंटाळला,
करियर बदलायचं ठरवून गाडीचं चाक झाला.
खड्डयात धडपडून, तापल्या रस्त्याचे चटके खाऊन,
आता चाक वैतागलय,
पुन्हा पंखा होण्यासाठी धडपडतय.  

Monday, June 30, 2014

पंखा ७

पंखा जेव्हा फिरतो खूप ,
वंगण त्याच जुनं होतं. 
धूळ माखल्या पात्यामध्ये 
अन स्वतःच  हरवून बसतो. 
जळमटे काढली , तेल वंगण बदललं की 
पंखा पुन्हा जोसात फिरतो. 

Sunday, June 15, 2014

चर्चा

काल माझ्या घरी  माझे दोन लेखक मित्र आले , सहजच. पाच दहा मिनिटात निघू म्हणाले आणि  दुपारी जेवायलाच थांबले. चागली चार पाच तास चर्चा सुरु होती त्यांची. मी मात्र श्रोत्याच्या भूमिकेत शांत बसलो होतो . घरचे जरा वैतागलेले वाटले पण मी त्याचं कडे दुर्लक्ष केलं. ४ वाजता चहा घेताना दोघांच एकमत झाल की  आजकाल दर्जेदार साहित्य बांधलं जात नाही म्हणून . दोघेही हळहळले, आणि जाताजाता तू हि काहीतरी केलं पाहिजे अस माझ्याकडे बघत बोलले. ते गेल्यावर मी पण निश्चय केला, काही तरी करूया असा, समोरच माझ्या लेखक मित्रांची पुस्तके होती ती मी एकत्र केली, खणातून जुनी साठवलेली वर्तमानपत्रे काढली आणि पुस्त्काबोबत घट्ट बांधून टाकली . साहित्य कसदारपणे बांधल म्हणून मी खुश , घरची रद्दी एकत्र झाली म्हणून घरचे खुश .    

Friday, January 24, 2014

त ला त ध ला ध म ला म

त ला त ध ला ध म ला म 
अग एक चहा आण न ग 
(चहा कश्याला आता कडमडायला ?)
अग लिहायला बसलोय ना मी 
विचार  नको का यायला मला ?

त ला त ध ला ध म ला म 
काय लिहावं बर 
एखाद नाटक 
नको त्या पेक्षा 
दीर्घ कविता बरी ,
ते ही नको 
आजकाल तिला ही नाही कोणी वाली 

त ला त ध ला ध म ला म 
काय लिहाव बर ?
अग चहा मिळेल न ग ?
गरज आहे मला 
विचार नाही सुचत मला 

त ला त ध ला ध म ला म 
कादंबरी ला म्हणतो मम ,
इतिहासातली पात्र करतो जिवंत 
पण आधी आभ्यास करतो 
ती जुनी बखर चाळतो 

त ला त ध ला ध म ला म 
किती हे रटाळ 
नुसते टेक्निकल लिखाण 
झोप येतेय मला 

त ला त ध ला ध म ला म 
अग चहा नको मला 
डोळे जड झालेत 
झोपतो थोडा 
साहित्याचा इतका डोस 
आजच्या पुरता पुरे झाला 
त ला त ध ला ध म ला म