Thursday, May 5, 2016

मांजरवाला

आमची सोसायटी अगदी चौकाला लागुनच आहे. माझ्या खोलीतून चौक स्पष्ट दिसतो. चौक शहराच्या end ला असल्यामुळे इथे वाहनांची जाम रहदारी असते.चौकातून डावीकडे वळल की नदीवरचा पूल लागतो. पूर्वी मी मित्रांसोबत तिथे पोहायला जात असे. उजवीकडचा रस्ता सरखेलीस जातो, तिथली म्हसोबाची यात्रा खूप प्रसिध्द आहे. चौकासमोरचा रस्ता अपघाती वळण असं लिहिलेल्या टोकापर्यंत जातो, तिथून पुढे भिराडी चा घाट सुरु होतो. पूर्वी मित्रांसोबत मी गावभर भटकत असे, सायकल फिरवणे हा तर आमच्या ग्रुप चा छंदच. खूप मजा यायची, आता नुसत्या आठवणी. त्या अपघातामुळे माझं शरीर निकामी झालं आणि मी बेडला चिकटलो तो चिकटलोच. हा! झाली आता त्याला तीन चार वर्ष, नेमकं आठवत नाही, पण तो क्षण कधीच विसरता येणार नाही. मी सुसाट सायकलवर होतो, चौक क्रॉस करणार इतक्यात घाटातून येणाऱ्या गाडीचा अंदाज चुकला, आणि ती जी स्लीप झाली ती माझ्यावरच, ड्रायव्हर जागीच खपला, मी मात्र थोडक्यात बचावलो. किती मजेशीर ना " थोडक्यात बचावलो ". निर्जीव शरीर घेऊन जगणे म्हणजे काय ते तुम्हाला नाही कळणार. माझ्यापेक्षा तो ड्रायव्हर नशीबवान, लवकर सुटला. मी मात्र अडकलोय या शरीरात, कधी सुटका होईल देव जाणे. असो!

बिछान्यात पडल्या पडल्या मला खिडकीतून समोरचा चौक स्पष्ट दिसतो. चौकातल्या झाडाखाली एक मांजरवाला नेहमी येऊन बसतो , अपघाताआधी कधी दिसला नाही पण हॉस्पिटल मधनं तीन चार महिन्यांनी जेव्हा घरी आलो त्या नंतर एक दिवस अचानक तो मला दिसला. मांजरवाला हा प्रकार मला नवीन होता पण सांगणार कोणाला जिथे शरीरच धड नाही तिथे वाचा तरी कशी नीट असणार? ते जाऊ दे. त्या मांजरवाल्याकडे अनेक पिंजरे असतात आणि त्यात मांजरीची लहान लहान पिल्ले, त्यांचे खेळ बघता बघता कसा वेळ जातो ते काळतही नाही, त्या पिल्लांना बघण्याचा छंदच लागलाय मला. मांजरवाला रोज सकाळी येऊन झाडाखाली बसतो. तेव्हा त्याच्या कडे फारशी मांजरे नसतात, हळू हळू कुठून तरी त्याच्या कडे ती येऊ लागतात. मग रात्री तो त्यांना जमा करतो आणि निघून जातो. त्याची जाण्याची वेळ ठरलेली नसते , कधी खूप लवकर तर कधी खूप उशिरा, त्याला वाटेल तेव्हा तो जातो.
 नेहमी प्रमाणे मी पिल्लांचे खेळ बघत बसलोय, वेळ चांगला जात होता. इतक्यात काय झाल कोणास ठाऊक मांजरवाल्याने त्याच्या गोणीतून चार पाच रिकामे पिंजरे काढले आणि तो कसली तरी वाट बघू लागला, कळतच नव्हतं काय चाललय ते, तंद्रीच लागली आणि इतक्यात प्रचंड मोठा आवाज झाला, मी दचकलोच, पाहिल तर समोर भयानक अपघात झालेला गाडी आणि ट्रक ची टक्कर , बापरे! आसपास चे लोक अपघाताच्या जागेकडे धावले, मला सगळ स्पष्ट दिसत होत. आई बाबा ही तेच बघत होते. ambulance, पोलिस आणि झालेल्या गर्दी मुळे जाम गोंगाट वाढला होता, गाडीतले पाचही जण जागीच गेले होते. ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली होती. हॉस्पिटलची लोकं पाची बॉडीना ambulanceमध्ये ठेवत होती, इतक्यात माझ लक्ष नेमक मांजरवाल्या कडे गेल. तो आगदी तिथेच होता गर्दीकडे त्याच मुळी लक्षच नव्हत, त्याला कोणी हटकत सुद्धा नव्हत , तो मात्र काही नव्या पिल्ला सोबत खेळत होता, मग त्याने एक एक करून त्या पिल्लांना पिंजऱ्यामध्ये भरायला सुरुवात केली, एकूण पाच पिल्ले होती आणि सहा पिंजरे. त्यांनी क्षणभर माझ्या कडे पाहिलं आणि तो हसला. त्या नजरेला मी खूप घाबरलो. माझी नजर मी फिरवली पण डोक्यात विचार सुरु झाले ,अपघात …पाच बॉडी …. पाच पिल्ले …सहा पिंजरे …. कोण आहे तो मांजरवाला ? कुठून येतात ती पिल्ले ? तो सहावा पिंजरा कोणासाठी? छे, सारे माझ्या मनाचे खेळ. की नाही काही तरी वेगळं … मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतोय, पण विचार काही जात नाहीत.  

माझ्या शरीराला घाम का फुटलाय, मी डोळे मिटून घेतले.  डोळे उघडले तेव्हा माझ्या भोवती बरीच माणस जमा झाली होती ,आई बाबा आणि डॉक्टर ही होते कदाचीत. मी बेशुद्ध पडलो होतो वाटत. मला सलाईन लावली होती, बाबाकडे पाहत त्यांनी नकारार्थी मान हलवली. आईने पदर डोळ्याला लावला. तिचा हुंदका मला एैकू आला. इतक्यात माझी नजर चौक कडे गेली मांजरवाला माझ्याकडे पाहत होता, त्याचा तो रिकामा पिंजरा आणि इतर पिंजऱ्यातली पिल्ले मला दिसत होती. डोक्यात सहजच विचार आला आपल्याला मांजर होता येईल का ?किती मजेशीर विचार, इतक्यात त्याने माझ्या कडे हात केला. मी टुणकन उडी मारली, अलगद जमिनीवर उतरलो, छोट्या छोट्या उड्या घेत मी मांजरवाल्याकडे जाऊ लागलो. मागे रडायचा आवाज येत होता,  मी तिकडे दूर्लक्ष केलं, मी मांजरवाल्या जवळ गेलो, त्याने मला अलगद उचलून घेतल, थोडं कुरुवाळल, आणि एका पिंजऱ्यात ठेवलं . किती उबदार आहे हा पिंजरा. तिथून मला समोरची इमारत दिसत होती आणि तिथल्या एका खिडकीतल्या माझ्याकडे पिंजऱ्यातून मी बघत होतो.