Friday, October 26, 2018

नवस

रावसाहेब मालकाचा खूप लाडका होता. सऱ्या शिवारात बे रोखठोक रावसाहेब कुठे ही जाऊ शके. सकाळी मालकाला उठवायची जबाबदारी रावसाहेबाकडेच होती आणि ती रावसाहेब मनापासून पार पडत असे. मालकाने एक हाक मारली की रावसाहेब असेल तिथून धावत येत असे. रावसाहेबाचा मालक देवभोळा होता, त्याला शिवाराच्या आंब्या लागत देवाचा दगड सापडला होता. रोज संध्याकाळी मालक देवाला दिवा लावून थोडं भजन गुणगुणत असे, तेव्हा रावसाहेबही त्याच्या जवळ जाऊन बसत असे. गेले किती तरी वर्ष हा नेम चालू आहे.
रावसाहेबाचा भैरू ही आता वयात आला होता, तो मालका जवळ जायचा प्रयत्न करत असे. त्याला ही बापा सारखं मालकाचं लाडकं बनायचं होत, पण मालकाचा जीव रावसाहेबावरच होता
एक दिवस मालक त्याच्या पोरीला सासुरवाडीहून बाळंतपणा साठी घेऊन आला. मालकाचा त्याच्या पोरीवर जाम जीव होता. तो तिला तळहाताच्या फोडागत जपत असे. तिला काही कमी पडू देत नसे. दिवसा मागून दिवस सरत होते आणि एक दिवस मालकाच्या पोरींचे दिवस भरले. गावातुन नर्स बाई मालकाच्या घरी बाळंतपण करायला आली. तासा मागून तास जात होते पण पोरगी काही बाळंत होत नव्हती. मालक चिंतेत देवाजवळ येरझाऱ्या घालत होता, अचानक मालकाने देवाला नवस केला, म्हणाला, " पोरीचं बाळंतपण नीट पार पडू दे तुला कोंबडा वाहीन"
मालकाचा नवस बोलून होतो न होतो तेव्हड्यात मालकाला घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मालकाच्या आनंदाला सुमार राहत नाही, देवाला डोकं टेकून मालक घरी धावत जातो. रावसाहेब एका कोपऱ्यातून हे सगळं पाहत होता.
दुसऱ्या दिवशी मालकाने साऱ्या गावाला पेढे वाटले. पेढे वाटून मालक घरी आला आणि त्याने रावसाहेबाला हाक दिली, रावसाहेब आनंदाने धावत मालकाजवळ आला. मालकाने रावसाहेबाला पेढा चारला आणि तेव्हड्यात मालकाला त्याचा नवस आठवला. जड अंतकरणाने मालक घरात गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक ताट होत, रावसाहेबाला घेऊन तो देवाजवळ आला. त्याने रावसाहेबाला हळद कुंकू वाहिलं. रावसाहेबाला आडवं पडून मालक जोरात ओरडला " देवा तुला नवसाचा कोंबडा वाहतो रे, माझ्या पोरीच अन नातवाच भलं कर!"
आता भैरू रोज सकाळी मालकाला उठवतो, तो मालकाचा लाडका झालाय.